सांगली : साखर दरात अचानक वाढ रोखण्यासाठी आणि बाजारातील झाल्याच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गेल्या दोन दिवसांत वसंतदादा मार्केट यार्ड आणि गणपती पेठेतील साखर व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. गणपती पेठ, मार्केट यार्ड परिसरातील दुकाने व गोदामांची केंद्रीय पथकासह जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने ठिकठिकाणी तपासणी करून कारवाईस सुरुवात केली. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी छापे टाकले. तत्पू्वी सांगली व मिरज शहरांतील विविध ठिकाणी साखरेच्या साठ्याची तपासणी केली. संयुक्त पथकामध्ये एफसीआयचे व्यवस्थापक जन्मजय सिंग, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहायक संचालक योगेश्वरू बोया, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, साखर विभागाचे लेखापरीक्षक शीतल चोथे, पुरवठा निरीक्षक राजू कदम यांचा समावेश होता.
साखर दरातील अचानक वाढ आणि त्यामागे साठेबाजीचा संशय असल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. साखर व्यापारी व गोदामचालकांना प्रत्येक शुक्रवारी शासनाच्या पोर्टलवर साखरेची आवक, विक्री आणि सद्यस्थितीतील साठ्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळून आल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा पुरवठा प्रशासनाने दिला. या कारवाईत दुकाने आणि गोदामांतील साठा तपासण्यात आला. प्रशासनाकडून सुरू असलेल्या तपासण्यांच्या अनुषंगाने बाजारातील साखरेचे वाढलेले दर आता कमी झाले आहेत. साठेबाजांवर वचक कायम ठेवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ही तपासणी मोहीम यापुढे सुरू राहणार आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय व जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. शहरात विविध ठिकाणी छापे टाकून साखरेच्या साठ्याची तपासणी केली.


















