सोलापूर : मंगळवेढा येथील ऊसदर समितीच्या बैठकीत ज्या साखर कारखान्यांनी निश्चित केलेला ऊसदर देण्याचे आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे दर दिलेला नाही, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. बैलपोळा आणि आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता तातडीने वर्ग करावा, अशी मागणी समितीने केली. या बैठकीस ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, सचिन पाटील, ॲड. राहुल घुले, निवास नागणे, श्रीमंत केदार, संगमेश केदार, बाळासाहेब बोबडे, संदीप फडतरे, पांडुरंग बाबर आदी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी गाळप हंगामात कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याने उसाला कोयता लावू नये, असा ठरावही एकमुखाने मंजूर करण्यात आला. गेल्यावर्षी ऊस दर आंदोलनादरम्यान तालुक्यातील दामाजी, युटोपियन, भैरवनाथ आणि फॅबटेक या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रति टन ३००० रुपये ऊसदर देण्याचे आश्वासन दिले. या कारखान्यांनी पूर्ण दर दिला आहे का, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात तातडीने सोडावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















