पुणे : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांकडे आतापर्यंत १ लाख ८७ हजार ५५३ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. यंदाची नोंदणी सरासरीपेक्षा सुमारे १८ हजार हेक्टरने अधिक आहे. गेल्या पाच गाळप हंगामांतील प्रत्यक्ष तुटलेल्या ऊस क्षेत्राची सरासरी १ लाख ६९ हजार ४७४ हेक्टर होती. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी एकत्रितपणे २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रातील उसाची तोड केली होती. त्या तुलनेत यंदासाठी आतापर्यंत झालेली १ लाख ८७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्राची नोंदणी सुमारे ९२ हजार हेक्टरने कमी आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या प्रत्यक्ष तोड क्षेत्राच्या तुलनेत यंदा कारखान्यांसमोर ऊस उपलब्धतेचे आव्हान राहण्याची शक्यता आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील उपलब्ध ऊस आणि वाढलेली गाळप क्षमता यांचा ताळमेळ साधताना आपला गाळप हंगाम किती दिवस चालेल, याकडेही साखर कारखानदारांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकार तसेच साखर कारखानदारांनी आगामी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी चालवली आहे. साखर आयुक्तालयाने गाळप परवान्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगामाची तारीख निश्चित होणार आहे. त्यापूर्वी साखर आयुक्तालयाकडून राज्यातील ऊस उपलब्धता, नोंदणी आणि गाळप क्षमतेचा आढावा घेतला जात आहे. सध्याची ऊस नोंदणी पाहता इंदापूर येथील बारामती अग्रोकडे जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ३६० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. त्यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना -१५ हजार ७२२ हेक्टर, भीमा सहकारी साखर कारखाना – १५ हजार हेक्टर, माळेगाव सहकारी साखर कारखाना १४ हजार १८२ हेक्टर, श्रीनाथ म्हस्कोबा – १३ हजार ८०५ हेक्टर आणि कर्मयोगी शंकरराव पाटील – १२ हजार ६५४ हेक्टर अशी नोंद आहे. सध्या उपलब्ध नोंदणीच्या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील ऊस उपलब्धतेचे प्राथमिक चित्र काहीसे आश्वासक दिसत आहे.


















