छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ कारखान्याच्या जप्त साखरेची विक्री करण्याचे खंडपीठाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची जप्त केलेली १३ हजार ५८१.५० क्विंटल साखर आणि मोलॅसिस विकण्यास परवानगी देताना त्यातून मिळणारी संपूर्ण रक्कम कारखानदाराच्या खात्यात न वळवता थेट न्यायालयात जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांनी दिले. ही विक्री महाराष्ट्राचे साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक (साखर), छत्रपती संभाजीनगर आणि विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ यांच्या उपस्थितीत व देखरेखीखालीच करावी, अशी अट घातली. विक्रीतून मिळणारा पैसा न्यायालयात जमा करावा लागणार आहे. ही प्रक्रिया चार आठवड्यांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याला दणका दिला आहे. कारखान्याने उसाची एफआरपी थकवून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले. साखर आयुक्त आणि साखर संचालकांनी २०२५-२६ गाळप हंगामातील उसाची एफआरपी थकीत राहिल्याने महसूल वसुली प्रमाणपत्रांतर्गत कारवाई केली होती. त्यानुसार, कारखान्याची गोदामे सील करून साठा जप्त करण्यात आला. याविरोधात कारखाना चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रा. लि. कंपनीने खंडपीठात धाव घेतली. मात्र साखर विक्री करून शेतकऱ्यांची देणी भागवण्याच्या मागणीला शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. शैलेंद्र गंगाखेडकर आणि अॅड. धनंजय पाटील यांनी विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने जप्त केलेली साखर आणि मोलॅसिसची विक्री करण्यास परवानगी दिली. या याचिकेवर आता ६ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here