काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या महिन्यात आलेल्या विनाशकारी महापुरातील मृतांचा आकडा वाढून 1,287 वर पोहोचला आहे. तर सुमारे 5,083 जण अद्याप बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित भागांत शोध आणि बचावकार्य सुरू आहे. सर्वाधिक 359 मृतदेह चितवन येथे सापडले आहेत. त्यानंतर नवलपरासी पूर्व 219, नवलपरासी पश्चिम 212, नुवाकोट 184, रसुवा 140, गोरखा 72, धादिंग 63 आणि तनहुन येथे 38 मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत 96 मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
बेपत्ता असलेल्यांमध्ये रसुवातील 2,130 आणि नुवाकोटमधील 2,340 जणांचा समावेश आहे. तसेच 583 विदेशी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्रिशूली 3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. संजय साह आणि कबीर महार्जन अशी त्यांची ओळख पटली असून, दोघांना हवाई मार्गाने काठमांडू येथे आणण्यात आले. आतापर्यंत सुरक्षा दल आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी 13,093 जणांची सुटका केली आहे. शोध, बचाव आणि मदतकार्यासाठी एकूण 21,421 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्राथमिक नुकसान अहवालानुसार 7,570 खासगी घरे, 48 सरकारी इमारती, 18 शाळा आणि 7 आरोग्य सुविधा बाधित झाल्या आहेत. सुमारे 55 किलोमीटर रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून 37 मोटरेबल पूल आणि 68 झुलते पूलही बाधित झाले आहेत. नेपाळ सरकारने या आपत्तीत झालेल्या एकूण आर्थिक नुकसानीचा अंदाज 38,754.68 कोटी नेपाळी रुपये व्यक्त केला आहे. तातडीच्या पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 795.3 कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.


















