कर्नाटक : उगार साखर कारखान्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी कर्मचारी, ग्रामस्थांचा मोर्चा

बेळगाव : बंगळूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने उगार साखर कारखाना सील करण्याचे पत्र दिले आहे. मात्र, सुमारे साडेचार हजार कामगार, ७० ते ८५ हजार शेतकरी कुटुंबे, व्यापारी आसपासच्या गावांवर अवलंबून आहेत. उगार खुर्द नगरपालिकेची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार आहे. रस्त्यावरील विक्रेते, हमाल, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. शहरातील व्यापारी, नागरिक साखर कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे कारखाना सीलबंद करण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी करत कर्मचारी व ग्रामस्थांनी मोर्चा काढला. याबाबत कागवाड तालुक्याचे उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे, शिरस्तेदार एन. ए. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

कारखान्यावरील कारवाई रद्द करावी या मागणीसाठी कामगारांनी गावात मोर्चा काढला. हा मोर्चा साखर कारखाना गेटपासून सुरू झाला. छत्रपती संभाजी सर्कलमार्गे मोर्चाने नगरपरिषद कार्यालयापर्यंत जाऊन मुख्याधिकारी कोल्हापुरे यांना निवेदन दिले. कारखाना सीलबंद करण्याचा आदेश देणारे पत्र रद्द न केल्यास आगामी काळात तालुका व जिल्हा पातळीवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कामगारांच्या या मोर्चाला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून मोर्चाला पाठिंबा दिला. कलाप्पा करगार, रमेश भिर्डीकर, अनिल नवलगेर, विजय यादव, श्रावण कांबळे, वकील राहुल कटगेरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सागर पुजारी, रामा शिरगन्नावर, जनशक्तीचे विनायक कांबळे, ग्रामस्थ, कामगार, अधिकारी, महिला उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here