पुणे : पुढील काही दिवसांमध्ये ऊसतोडणीचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. या काळात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने हंगामी कामगार साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल होतात. जिल्ह्यातील उसाच्या फडात मोठ्या प्रमााणात बिबट्यांचे वास्तव्य आहे. बिबट्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. ऊस तोडणीच्या वेळी अशा घटना आणखी वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी कारखान्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सूचना केल्या आहेत. ऊसतोडणीसाठी येणाऱ्या मजुरांना शक्यतो शेतात न ठेवता अन्य सुरक्षित ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
उसाच्या शेतात लपलेला बिबट्या आणि शेतालगत पाल टाकून राहणारे ऊसतोड मजूर यामुळे ऊसतोडणीच्या हंगामात हल्ल्यांचा धोका वाढतो. त्यामुळे ऊसतोड मजुरांची शक्यतो शेताऐवजी सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करावी, शेतात वास्तव्य असल्यास पालाभोवती चारही बाजूंनी तात्पुरते कुंपण करावे, वस्तीत पुरेशा विद्युत प्रकाशाची व्यवस्था करावी असे साखर आयुक्तालयाने सूचविले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांनीही पहाटे व सूर्यास्तानंतर शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, शेतात एकट्याने न जाता समूहाने आणि आवाज करत काम करावे तसेच ऊसतोडणीपूर्वी वनविभागाच्या मदतीने मजुरांमध्ये जनजागृती करावी असे स्पष्ट निर्देश साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने दिले आहेत. ऊस तोडणीसाठी आई-वडिल गेल्यानंतर त्यांच्या संरक्षणापासून दूर असलेली लहान मुले अधिक धोकादायक स्थितीत येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन मुलांच्या देखरेखीसाठी विशिष्ट व्यक्ती नेमावी. त्यांच्या संगोपनासह शिक्षणाचीही व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


















