सोलापूर : थकीत ऊस बिलप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिद्धनाथ शुगरसमोर ठिय्या आंदोलन

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने थकीत ऊसबिलप्रश्नी तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत पाच ऑक्टोबरपर्यंत बिले देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करण्याचे आश्वासन सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक धनंजय भोसले यांनी दिले आहे. त्यांनी दिलेला शब्द न पाळण्यास पुन्हा ठिय्या आंदोलन करणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले. बिले न मिळाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कारखान्याने सुरुवातीला प्रतिटन २८०० रुपये दर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, शेतकऱ्यांच्या हातात २२३७ रुपयेच टेकवण्यात आले, तर काही शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही. अशी फसवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.

गुरुवारी (ता. १०) स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यापूर्वी थकीत ऊस बिले तातडीने देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला. मात्र, त्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाला आठ महिने उलटून गेले आहे. नवीन हंगाम तोंडावर आला आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मागील हंगामाची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. यावेळी झालेल्या ठिय्या आंदोलनात सचिन मस्के, मोहसीन पटेल, ईस्माईल मुजावर, दीपक हजारे, रवी पाटील, अमोल पवार, युवराज भडकुंबे, काकासाहेब पाटील, अजिनाथ पवार, बापू टोणपे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here