नवी दिल्ली : भारतीय तांदळाच्या निर्यात दरांमध्ये या आठवड्यातही वाढ सुरूच राहिली असून, दरांनी वर्षभरातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. पुरवठा घटत असल्याने तसेच सामान्यपेक्षा कमी पावसामुळे उन्हाळी पिकाच्या उत्पादनाबाबत चिंता वाढल्याने तांदळाच्या दरांना आधार मिळाला आहे. कोलकाता येथील एका जागतिक व्यापार कंपनीच्या डीलरने हिंदू बिजनेसलाइनशी बोलताना सांगितले की, पावसातील तूट वाढत असल्याने तांदूळ उत्पादनाच्या अंदाजात घट केली जात आहे. त्यामुळे तांदळाचे दर चढेच आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबरमध्येही देशात सरासरीपेक्षा कमी मान्सून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारताच्या ५ टक्के तुटलेल्या उकडा तांदळाचा (पारबॉइल्ड राईस) निर्यात दर या आठवड्यात ३७१ ते ३७७ डॉलर प्रति टन राहिला. मागील आठवड्यात हा दर ३६९ ते ३७५ डॉलर प्रति टन होता. दरम्यान, भारताच्या ५ टक्के तुटलेल्या पांढऱ्या तांदळाचा दर ३६८ ते ३७३ डॉलर प्रति टन राहिला. दरम्यान, व्हिएतनामच्या ५ टक्के तुटलेल्या तांदळाचा दर गुरुवारी ४४० ते ४४५ डॉलर प्रति टन राहिला. मागील आठवड्याच्या तुलनेत या दरात कोणताही बदल झालेला नाही.
बांगलादेशाकडून सुगंधी तांदळाच्या निर्यातीवर मर्यादा
बांगलादेशने व्यापाऱ्यांना यापूर्वी मंजूर केलेल्या सुगंधी तांदळाच्या निर्यात प्रमाणात निम्मी कपात केली आहे. देशांतर्गत बाजारातील वाढत्या किमती आणि भविष्यात दर आणखी वाढण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने यापूर्वी ४५,२७० टन सुगंधी तांदळाच्या निर्यातीला मंजुरी दिली होती. मात्र, ३० ऑगस्टपर्यंत केवळ २,४१९ टन तांदळाची निर्यात झाली होती.सुधारित मंजुरीनुसार आता निर्यातदारांसाठी १.६० डॉलर प्रति किलो किमान निर्यात दर, सीमाशुल्क विभागाकडून गुणवत्ता तपासणी आणि निर्यातीतून मिळणारे परकीय चलन देशात परत आणण्याची अट लागू करण्यात आली आहे.
थायलंडच्या तांदळाचे दरही वाढले
दुसरीकडे, थायलंडच्या ५ टक्के तुटलेल्या तांदळाचा दर वाढून ४८८ डॉलर प्रति टन झाला आहे. मागील आठवड्यात हा दर ४८३ ते ४८५ डॉलर प्रति टन होता. बँकॉकमधील एका व्यापाऱ्याने सांगितले की, उत्पादनाची पातळी पुढेही कमी राहण्याची शक्यता असल्याने तांदळाच्या किमती वाढत आहेत. एकूणच, भारतातील कमी मान्सून पाऊस आणि पीक उत्पादनाबाबत वाढलेल्या चिंतेमुळे तांदळाच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारासोबतच तांदळाच्या निर्यात दरांवरही होत आहे.


















