इथेनॉलबाबत केंद्र सरकारने ठाम धोरण राबविण्याची गरज : माजी मंत्री शंकरराव गडाख

अहिल्यानगर : सोनई तालुक्यात पाऊस कमी असला तरी धरणांची स्थिती चांगली आहे. मुळा, निळवंडे व जायकवाडी बॅकवॉटरमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने उसाच्या लागवडी झाल्या आहेत. मार्च महिन्यातील चांगला साखर उतारा लक्षात घेऊन एक महिना अधिक साखर कारखाना सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. येत्या हंगामात मुळा साखर कारखान्याने १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती माजी मंत्री व मुळा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक शंकरराव गडाख यांनी दिली. ‘मुळा’च्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष भाऊसाहेब मोटे होते. साखर उद्योगाकडून सरकारला दरवर्षी नऊ हजार कोटी रुपये मिळतात. या उद्योगाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री गडाख म्हणाले की, साखर कारखान्यांनी केंद्र सरकारच्या आग्रहास्तव कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन इथेनॉल प्रकल्प उभारले. मात्र, धरसोडीचे धोरण आणि ऑईल कंपन्यांकडे साठा शिल्लक असल्याने सहकारी साखर कारखान्यांकडे इथेनॉलचा साठा वाढून उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यात सुधारणा होण्याची गरज आहे. दरम्यान, वार्षिक सभेत मागील वर्षाच्या गळीत हंगामात सर्वाधिक ऊस उत्पादन घेतलेले पार्थ दहातोंडे, दिलीप फलके, शीतल कर्डिले, उज्ज्वला रहाणे यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याने मागील हंगामात ९ लाख ३० हजार टनांचे गाळप आणि दररोज १० हजार टन ऊस गाळप करीत २५ फेब्रुवारीपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप केल्याची माहिती देण्यात आली. कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी स्वागत केले. अधिकारी रितेश टेमक, टी. आर. राऊत व योगेश घावटे यांनी विषयपत्रिकेवरील विषयांची माहिती दिली. सभासद कारभारी जावळे यांनी चर्चेत भाग घेतला. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक मंडळ, ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नानासाहेब तुवर, भाऊसाहेब निमसे, प्रभाकर कोलते, भाऊसाहेब लांडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here