कोल्हापूर : ओलम शुगरच्या ३०० केएलपीडी क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे लोकार्पण

कोल्हापूर : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे ओलम शुगरच्या ३०० केएलपीडी क्षमतेच्या नव्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागातील कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास ओलम ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुथुकुमार एन. यांनी व्यक्त केला. राजगोळी खुर्द येथील ओलम शुगरच्या नव्या इथेनॉल प्रकल्पाचे लोकार्पण मुथुकुमार एन. यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे बिझनेस हेड टी. कन्नन होते. यावेळी कंपनीचे कंट्री हेड संजय संचेती, युनिट हेड राधाकृष्णन आणि शेती अधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते.

कृषी उत्पादनांना मिळणार नवी बाजारपेठ

ChiniMandi WhatsApp Channel

या प्रकल्पात मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील कृषी उत्पादनांना नवी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे मुथुकुमार यांनी सांगितले. ओलम कंपनीने यूपीएलसह विविध कंपन्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कृषी विकास योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कंट्री हेड संजय संचेती यांनी नमूद केले.

२३ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘ओलम गौरव’ पुरस्काराने सन्मान

ओलमच्या उन्नत ऊस विकास कार्यक्रमांतर्गत एकरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या २३ शेतकऱ्यांचा ‘ओलम गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून ऊस उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. ओलम शुगरच्या नव्या इथेनॉल प्रकल्पामुळे कृषी उत्पादनांचा औद्योगिक वापर वाढण्यासह शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नरेंद्र रावत यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here