सातारा : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला २०२४-२५ च्या हंगामातील उल्लेखनीय तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघातर्फे प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार म्हणजे केवळ एका वैयक्तिक यशाचा टप्पा नसून, संपूर्ण कृष्णा परिवाराला मिळालेली पोचपावती आहे. भविष्यातही कारखान्याचे विस्तारीकरण, उपपदार्थ निर्मिती, सौरऊर्जा व सीबीजी बायोगॅस यासारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून कारखान्याला अधिक सक्षम बनवून शेतकऱ्यांना जास्तीतजास्त ऊसदर देण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा भावना अध्यक्ष डॉ. भोसले यांनी व्यक्त केल्या.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष जे. डी. मोरे, संचालक धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, बाजीराव थोरात, आनंदा खबाले, अरविंद पाटील, सत्यजित पाटील, बाळासाहेब जगताप, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सी. एन. देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार, बालाजी पबशेटवार उपस्थित होते. कारखान्याने २०२४- २५ चा गाळप हंगाम आव्हानात्मक असतानाही कारखान्याने उत्कृष्ट नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत उच्च साखर उतारा व तांत्रिक कार्यक्षमतेत अव्वल स्थान पटकावले याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


















