अहिल्यानगर : फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडतर्फे आयोजित राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार २०२४-२५ वितरण सोहळ्यात अशोक सहकारी साखर कारखान्यास संस्थात्मक सामाजिक दायित्व (सीएसआर) क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, एनएफसीएसएफचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशोक कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हाइस चेअरमन आदिनाथ झुराळे, संचालक हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, पुंजाहरी शिंदे, नीरज मुरकुटे तसेच कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अशोक कारखान्याने साखर उत्पादनाबरोबरच शिक्षण, जलसंधारण, कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शैक्षणिक संकुले, बंधारे व जलसंधारणाची कामे, ऊस विकास, पाणी बचत तसेच कामगार कल्याणाच्या माध्यमातून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कारखान्याने योगदान दिले आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत कारखान्यास सीएसआर विभागातील राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्काराबद्दल बोलताना भानुदास मुरकुटे म्हणाले, अशोक कारखान्यास मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे कारखान्याचे शेतकरी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक कामगार, संचालक मंडळ, अधिकारी आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाच्या कष्ट, योगदान आणि निष्ठेची पावती आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे कारखान्याच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याला देशपातळीवर मान्यता मिळाली असून, भविष्यातही सामाजिक विकासाच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मुरकुटे यांनी नमूद केले.


















