कोल्हापूर : ‘गोडसाखर’ने उसाला वाढीव दर द्यावा; शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकारी संचालकांना निवेदन

कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर (गोडसाखर) कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दर द्यावा, या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास कारखान्याची ऊस वाहतूक रोखून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, शेतीमालाला योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. साखरेच्या दरवाढीचा व इथेनॉल उत्पादनाचा मोठा आर्थिक फायदा साखर कारखान्यांना होत आहे. त्यामुळे या वाढीव नफ्याचा लाभ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, गेल्या हंगामात साखरेचा भाव ३,५०० ते ३,६०० रुपये क्विंटल असताना शेतकऱ्यांना प्रतिटन ३,००० ते ३,५०० रुपये दर मिळाला होता. चालू वर्षी साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाल्यामुळे गेल्या हंगामातील प्रतिटन ३०० रुपयांप्रमाणे थकीत वाढीव हप्ता त्वरित वर्ग करावा. १५ ऑक्टोबरपासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे. त्यापूर्वी म्हणजेच दिवाळी सणाआधी ऊस दरवाढीबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा शिवसेनेच्या वतीने कारखान्याची ऊस वाहतूक रोखली जाईल. यावेळी तालुकाप्रमुख अजित खोत, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, दिनेश कुंभीरकर, शैल्लापा साखरे, मारुती जाधव, वसंत नाईक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here