नांदेड : सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ऊसतोडणीनंतर शेतात पाचट पसरवून ठेवल्यास त्याचा आच्छादन म्हणून उपयोग होतो. यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत होते. तसेच जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. पाचट कुजल्याने जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसतोडणीनंतर शेतातील पाचट जाळण्याऐवजी ते शेतातच आच्छादन म्हणून ठेवावे, असे आवाहन साखर कारखान्यांकडून करण्यात येत आहे. पाचट जाळल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांना हानी पोचू शकते. परिणामी जमिनीची सुपीकता आणि ओलावा टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाचट जाळण्याची प्रथा टाळून त्याचा शेतीसाठी उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत शिऊर साखर कारखाना लि. (वाकोडी, ता. कळमनुरी) आणि श्री सुभाष शुगर प्रा. लि., हडसणीचे अध्यक्ष सुभाषराव लालसाहेब देशमुख यांनी सांगितले की, ऊस तोडणीनंतर पाचट जाळण्याऐवजी त्याचे आच्छादन म्हणून व्यवस्थापन करावे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याची बचत, जमिनीची सुपीकता टिकविणे, ऊस उत्पादन वाढविण्यासाठी पाचट व्यवस्थापन हा कमी खर्चातील प्रभावी उपाय ठरू शकतो. दुष्काळसदृश परिस्थितीत ऊस पिकाला पाण्याचा ताण बसू नये, यासाठी पाचट आच्छादनासोबत ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. पिकाच्या गरजेनुसार सिंचनाचे नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाचट व्यवस्थापन आणि पाणी बचतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास ऊस पिकाचे नुकसान कमी करून उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होईल. पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास ते कुजून जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासह उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास मदत होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता टिकून राहते. याशिवाय पाचटाच्या आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासही हातभार लागतो.


















