सोलापूर: यंदाच्या हंगामातील उसाला पाच हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र अनेक कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप सुरू केल्याने शेतकरी संघटनांमध्ये संताप आहे. यातच ऊस दर संघर्ष समितीने गुरुवारी (ता. २९) आक्रमक पवित्रा घेतला. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गाळप बंद पाडले. दुपारपासून गाळप बंद झाल्याने ऊसतोडणी आणि वाहतूक ठप्प झाली आहे. उसाला पहिली उचल पाच हजार रुपये जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, ऊसदर निश्चित करून जाहीर केल्याशिवाय तोडणी सुरू करू नये, या मागणीसाठी तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पुणे-सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
करकंब येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या गव्हाणीत गुरुवारी दुपारपासून कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. व्यवस्थापनाने पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि गाळप सुरू होऊ देणार नाही, असा इशारा ऊस दर संघर्ष समितीने दिला. आंदोलनात दीपक भोसले, समाधान फाटे, सचिन पाटील, विक्रांत जगदाळे, निवास नागणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दरम्यान, तांदूळवाडी येथील आंदोलनावेळी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती भिमाशंकर जमादार, माजी सरपंच सिद्धाराम हेले यांनी, योग्य दर मिळेपर्यंत एकही उसाचा ट्रॅक्टर कारखान्यात जाणार नाही, असा इशारा दिला. कैलास मेरू आणि अशोक कस्तुरे यांनीही मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. मुस्तीचे सरपंच बालाजी जमादार, उपसरपंच हरीश शिंदे, लिंगराज पाटील, रविकिरण मेहता, अशोक लांडे, संजय स्वामी, प्रितीश हेले, अप्पू कळके, देवराज बिराजदार, राहुल मोरडे, चंद्रकांत बिडवे, संगप्पा कराळे, लक्ष्मण वायचळे, संदीप कराळे, कल्याणी भडंगे, पंडित लुत्ते, मास्ती बिराजदार, सैपन तांबोळी आदी सहभागी झाले होते.

















