कर्नाटक : इंधन कंपन्यांकडून E20 मध्ये मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रण होत असल्याचा मंत्री अर्शद यांचा आरोप

बंगळूरू : कर्नाटकमध्ये ई-२० पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉलची भेसळ होत असल्याचा दावा मंत्री रिझवान अर्शद यांनी केला आहे. अर्शद यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र लिहून ई २० पेट्रोलची गुणवत्ता आणि प्रमाणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्शद यांनी पत्रात राज्यातील ६३ पेट्रोलपंपांची तपासणी केल्याचा उल्लेख केला आहे. तेल कंपन्यांनी सादर केलेल्या ४२ अहवालांमध्ये इथेनॉलचे प्रमाण नमूद केलेले नाही. तसेच प्रयोगशाळेत तपासलेल्या १४ नमुन्यांपैकी ११ नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आढळले. एका नमुन्यात हे प्रमाण तब्बल ३१.२ टक्के असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून कर्नाटक आणि केंद्र सरकारमधील संघर्ष सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पेट्रोलपंपावर इंधनातील इथेनॉलचे प्रमाण दर्शविणारे फलक लावले जावेत, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलावर इथेनॉलचे प्रमाण नमूद करावे, ई-१० आणि इथेनॉलमुक्त पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे, इंधनाच्या गुणवत्तेची तपासणी स्वतंत्र प्रयोगशाळेमार्फत करावी आणि वाहनांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी स्वतंत्र ई-२० निधी स्थापन करावा अशा मागण्या कर्नाटकने केंद्राकडे केल्या आहेत. याशिवाय, राज्यात प्रीमियम दर्जाच्या पेट्रोलमध्येही इथेनॉलचे प्रमाण अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. प्रतिलिटर १२० ते १४० रुपये दराने विकल्या जाणाऱ्या प्रीमियम पेट्रोलमध्येही मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिसळले जात असल्याने ग्राहकांना अपेक्षित दर्जाचे पेट्रोल मिळत नसल्याचे अर्शद यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here