सोलापूर : जिल्ह्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना (पडसाळी, ता. माढा) आणि गोकुळ शुगर इंडस्ट्रीज (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) या कारखान्यांर यापूर्वी ‘आरआरसी’ कारवाई करण्यात आली होती. या दोन कारखान्यांसह धाराशिव जिल्ह्यातील क्युनर्जी इंडस्ट्रीज (भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना), समुद्राळ (ता. उमरगा) आणि आयान मल्टीट्रेड एलपीजी (बाणगंगा सहकारी साखर कारखाना), इडाजवळा (ता. भूम) या कारखान्यांना २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी शासनाकडून अद्याप परवाना मिळालेला नाही. प्रादेशिक सहसंचालक (साखर) किरण गायकवाड यांनी या माहितीला दुजोरा दिला. परवान्याविना गाळप सुरू केल्यास या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
साखर सहसंचालकांनी सांगितले की, विभागातील ३५ साखर कारखान्यांनी अर्ज केले होते. धाराशिव जिल्ह्यातील १४, तर सोलापूर जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा त्यात समावेश होता. काही कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली होती. कारखान्यांची आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच गाळप परवाने देण्यात आले आहेत. परवाना न मिळालेल्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप करू नये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही आपले नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी परवाना न मिळालेल्या कारखान्यांना गाळपासाठी ऊस देऊ नये,. परवान्याविना गाळप सुरू केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कारखान्यांची राहील, असे सहसंचालक गायकवाड यांनी स्पष्ट केले.

















