कोल्हापूर : जिल्ह्यातील आठ कारखाने करतात सांडपाण्याचा पुनर्वापर, पाणी बचतीचा दिला मंत्र

कोल्हापूर : ऊस लागवडीसाठी आणि त्याच्यापासून साखर बनवण्यासाठी सर्वाधिक पाणी लागते. बहुतांशी सर्व साखर कारखाने हे पाणी नदीतून उचलतात. तसेच कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा नदीतच सोडतात. काही कारखाने अद्याप त्यांच्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाहीत. मात्र, जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यामुळे हे साखर कारखाने नदीतून पाणी उपसा करत नाहीत आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडत नाहीत. शून्य विसर्गाचा अवलंब करणाऱ्या कारखान्यांमध्ये डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना (ता.गगनबावडा), कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना (ता.करवीर), श्री दत्त दालमिया साखर कारखाना (ता.पन्हाळा), दत्त सहकारी साखर कारखाना (ता.शिरोळ), श्री गुरुदत्त शुगर लि. (ता.शिरोळ), दौलत अथर्व साखर कारखाना (ता.चंदगड), ओलम ग्लोबल अॅग्री कमोडीटीज इंडिया प्रा.लि. (ता.चंदगड) आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना (ता.हातकणंगले) यांचा समावेश आहे.

साखर कारखान्यांना उसाच्या गाळप प्रक्रियेत जादा पाणी लागते. त्यासह त्या सांडपाण्याच्या निर्गतीचा मोठा प्रश्न असतो. जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. ते एक लाख ३३ हजार ३०० टन उसाचे गाळप करतात. त्यातून १७ एमएलजी सांडपाणी तयार होते. यातून प्रतिदिन १७ हेक्टर क्षेत्राला पाणी देता येते. सर्व कारखान्यातील सांडपाण्याचा विचार करता २५५ हेक्टर उसाला पाणी देता येते. गळीत हंगामात साखर कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून यातील आठ पाळ्यांचे पाणी देता येऊ शकते. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी त्यांच्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे सुरू केले आहे. आठ कारखान्यांनी, तर शून्य विसर्ग प्रक्रिया अमलात आणली आहे. नदी प्रदूषणमुक्त करणे आणि पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर याचे अनुकरण राज्यातील कारखान्यांनी केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारे धोरण शासनाने बनवावे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी व्यक्त केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here