सांगली : हुतात्मा कारखान्याकडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल जमा, शेतकऱ्यांना मिळाले प्रतिटन ३९०८ रुपये

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३९०८ रुपये प्रतिटन दराने ऊस बिल दिले आहे. कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ मधील १५ ते ३१ ऑक्टोबर या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ७२ हजार ३७७ टन उसाचे २८ कोटी २८ लाख ५२ हजार रुपयांचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले. हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी व संचालक गौरव नायकवडी यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या अध्यक्ष जयश्री अहिर, उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या हस्ते क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ऊस बिलाची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली.

याबाबत माहिती देताना किरण नायकवडी म्हणाले, कारखान्याने बँकेकडून मिळणारी उचल, साखर उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक, देखभाल-दुरुस्ती आणि बँकांचे व्याज अशा आर्थिक जबाबदाऱ्या असतानाही योग्य नियोजनातून शेतकऱ्यांना वेळेत बिल अदा केले आहे. प्रतिटन ३९०८ रुपये पहिली उचल जाहीर केली होती. त्यानुसार शेजारील कारखान्यांच्या दरांचा आणि परिस्थितीचा विचार करून यापेक्षा अधिक रक्कम देण्याचीही भूमिका आहे. दरम्यान, कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू असून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे असे गौरव नायकवडी यांनी सांगितले. केदार नायकवडी, तुकाराम डवंग, विश्वास थोरात, नंदू पाटील, भीमराव अहिर, बाळासाहेब यादव, महादेव पाटील, बाळासो माळी, पांडुरंग माळी, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सचिव मुकेश पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here