लातूर : ऊस दर संघर्ष समिती व विविध शेतकरी संघटनांच्यावतीने मंगळवारी देवणी तालुक्यातील जागृती शुगर कारखान्यासमोर दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले. कारखान्याने उसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर जाहीर करावा आणि कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस वेळेत उचलावा अशा दोन प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, भारतीय किसान युनियनचे प्रदेश प्रवक्ते राजकुमार सस्तापुरे आदींच्या उपस्थितीत हे धरणे आंदोलन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यातील उसाला दर द्यावा. सध्या कारखान्याकडून ऊसतोडीस होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाळलेल्या उसाच्या तोडीला प्राधान्य देण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी कारखाना प्रशासनाने सभासदत्व, दर्जा किंवा तोडणी कार्यक्रमाची अट न घालता वाळलेल्या उसाच्या तोडीला प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच परराज्यातील उसाची वाहतूक न करता स्थानिक कार्यक्षेत्रातील उसाची तोड करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. आंदोलनाला प्रशांत पाटील, प्रहारचे राजाभाऊ चौगुले, भारती किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, कारखाना प्रशासनाच्यावतीने जागृती शुगर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ऊस दरवाढीबाबत वरिष्ठ संचालक मंडळ लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन दिले.


















