कोल्हापूर : अपुरा पाऊस, वाढती उन्हाची तीव्रता आणि दुष्काळाचे सावट अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या यंदाच्या ऊस गाळप हंगामात पहिल्या २० दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी २४ नोव्हेंबर २०२६ अखेर २४ लाख ८९ हजार ७९२ टन उसाचे गाळप केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळपाचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी फेब्रुवारीपर्यंत चालणारा गाळप हंगाम यंदा मात्र महिनाभर आधीच संपण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा १ कोटी ९२ लाख १५४ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. यामध्ये आडसाली, खोडवा आणि पूर्वहंगामी उसाचा समावेश आहे. मात्र, यंदा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे उसाचे काही क्षेत्र चाऱ्यासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यातच नदीकाठावरील पाणीउपसा वारंवार बंद केला जात असल्याने उसाला पुरेसे पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी, अनेक शेतकरी हा ऊस दुष्काळी भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र मोठे असले तरी प्रत्यक्षात गाळपासाठी किती ऊस उपलब्ध होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साखर उताऱ्यातही घट
जिल्ह्यातील २२ पैकी २० साखर कारखान्यांनी नोव्हेंबरमध्ये गाळप हंगाम सुरू केला, तर दोन कारखान्यांचा हंगाम ऑक्टोबरमध्येच सुरू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.९६ टक्के इतका मिळाला आहे. गतवर्षी संपूर्ण गाळप हंगामात सरासरी ११.२८ टक्के साखर उतारा मिळाला होता. यंदा आतापर्यंत २४ लाख ७८ हजार ८५९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
सांगली जिल्ह्यात गाळपाचा वेग अधिक
सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने ऑक्टोबर महिन्यातच सुरू झाल्याने तेथील गाळपाचे प्रमाण कोल्हापूरच्या तुलनेत अधिक आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाख ४५ हजार ३३१ टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत ५३.३५ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ५३.८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.


















