फेब्रुवारीमध्येच वाढले एप्रिलइतके तापमान, गव्हाचे उत्पादन मात्र न घटण्याचा दावा

नवी दिल्ली : यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात एप्रिल महिन्यासारखा उन्हाळा जाणवला. मार्च महिन्यात तर तापमानाचा उच्चांक सुरू आहे. मात्र, या उन्हाचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्याचा पिकावर तितकासा परिणाम होणार नाही. हवामान बदलल्यानंतर शेतकऱ्यांनी सिंचन केले आहे. त्यामुळे शेतांचे तापमान २ ते ३ डिग्रीने घटले. त्यातून पिकांचे नुकसान वाचले आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तोमर म्हणाले की, फेब्रुवारीत जे तापमान होते, त्याचा गव्हाच्या पिकावर काही खास फरक पडलेला नाही. या वर्षी गव्हाचे उत्पादन नियमित राहिल. आयसीएआरच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिट अँड बाली रिसर्च कर्नालने स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि कृषी विज्ञान केंद्रांशी संपर्क साधून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार या वर्षी गव्हाचे उत्पादन नियमित असेल. उत्तर भारतात फेब्रुवारीमध्ये तापमान ३२ ते ३३ डिग्री सेल्सिअस होते. मध्य आणि दक्षिण भारतात तापमान अधिक असते. तेथे ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला होता. गेल्या वर्षी गव्हाच्या उत्पादनात घट दिसून आली होती. रशिया-युक्रेन युद्धानंतर गव्हाच्या किमती भडकल्या. त्या नियंत्रित आणण्यासाठी केंद्र सरकारने सातत्याने पावले उचलली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार २०२३-२४ मध्ये गव्हाचे उच्चांकी उत्पादन होईल. देशात ११ कोटी २१.८ लाख टन गव्हाचे उत्पादन होऊ शकेल असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here