सोलापूरच्या शेतकऱ्याने घेतले एकरी १०० टन उत्पादन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या मोरोची येथील लक्ष्मण सूळ यांनी योग्य व्यवस्थापनाने एका एकरमध्ये १०० टन उसाचे उत्पादन मिळवले आहे. कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी पिकाचे व्यवस्थापन काटेकोरपणे करावे लागते. पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच लागवडीचे नियोजन व लागवडीचा योग्य कालावधी या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात.

अहमदनगर लाईव्ह २४ ने दिलेल्या वृत्तानुसार, मोरोची येथील शेतकरी लक्ष्मण सूळ यांची ३१ एकर शेती आहे. या क्षेत्रामध्ये ते डाळिंब, केळी ही पिके घेतात. सध्या त्यांनी पाच एकरात सिताफळ, दीड एकरात केळी, सीताफळामध्ये पपई आणि डाळिंबात शेवगा आंतरपीक घेतले आहे. ऊस हे त्यांचे मुख्य पीक आहे. सुमारे १४ एकरवर ऊस पीक आहे. प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश कबाडे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रयोगांचा अवलंब करत त्यांनी शास्त्रशुद्ध ऊस शेती केली. एका एकरात १०० टन उत्पादन मिळवले.

सुळ यांनी ऊसाच्या कांड्याऐवजी रोपांची लागवड केली. खोडवा ऊस तुटल्यानंतर पाचटची कुट्टी करून त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा वापर केला. ताग लागवड करून तो ५० दिवसांनी जमिनीत गाडला. जमीन तापवून नियोजनबद्ध लागवड केली. लागवडीचे अंतर हे पाच बाय दोन किंवा साडेपाच बाय दीड फूट असे ठेवले. ८६०३२ हे वाण वापरले. खतांचे योग्य व्यवस्थापन केले. ठिबकच्या माध्यमातून एकरी बारा किलो अमोनियम सल्फेट, सहा किलो पोटॅश, तीन किलो पोटॅशियम सल्फेट या पद्धतीचे मात्रा ऊस काढणीच्या एक महिन्यापर्यंत दिली. सुळे म्हणाले की, एका एकरमध्ये उसाची संख्या ४० ते ४५ हजारांच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला. उसाचे वजन दोन ते तीन किलो मिळाले. त्यातून एकरी शंभर टन किंवा त्यापुढे उत्पादन मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here