राज्याच्या साखर उद्योगाच्या विकासासाठी योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न: साखर आयुक्त शेखर गायकवाड

पुणे : शेती आणि शेतकऱ्यांची प्रगती करण्यावर भर, त्याचबरोबर शेतकरी हिताचे निर्णय घेता आले, याचे खूप समाधान आहे. राज्याच्या साखर उद्योगाच्या विकासासाठी आपल्यापरीने योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. निमित्त होते भूमाता परिवार, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब फाउंडेशन आणि शुगरटुडे मॅगेझीनच्या संयुक्त विद्यमाने शेखर गायकवाड यांच्या शासकीय सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित ऋणनिर्देश व सत्कार सोहळ्याचे. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात कृषिमहर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गायकवाड यांच्यावरील विशेष ऋणनिर्देश अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘शुगरटुडे’ मॅगेझीनने हा अंक प्रसिद्ध केला आहे.

यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले कि, राज्य ऊस, साखर आणि आता इथेनॉल उत्पादनात आघाडीवर आहे. साखर आयुक्त म्हणून आव्हानात्मक परिस्थितीतही शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या हिताचे निर्णय घेता आले. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेता आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, शेतकरी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्या घटकाच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी गायकवाड यांना अनेकदा मिळाली. सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे, अभ्यासू व आकलनक्षमता असणारे फार मोजके अधिकारी आहेत. त्यामध्ये शेखर गायकवाड अग्रस्थानी आहेत.

यावेळी आमदार अशोक पवार, सहकार आयुक्त अनिल कवडे, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता हनुमंतराव धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील, सौ. वंदना गायकवाड, सौ. शालिनीदेवी मुळीक, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, उद्योजक बी. बी. जाधव, शुगरटुडे मॅगझीनचे मुख्य संपादक नंदकुमार सुतार, अतुल हिवाळे यांच्यासह साखर कारखानदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here