कोल्हापूर : गेल्या हंगामातील ४०० रुपये आणि यंदाच्या हंगामासाठी साडेतीन हजार रुपये पहिली उचल देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी उसतोडी बंद पाडत आहेत. एकीकडे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असताना दुसरीकडे गाळप लांबणीवर पडत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा निघावा, असे मत शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
साखर कारखानदारांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलन सुरू केल्याचा आरोप केला आहे. शेट्टी यांनी आमची मागणी मान्य केल्यास लोकसभा न लढविण्याचे आव्हान कारखानदारांना देत त्यांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. साखर कारखानदारांकडून कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे हे शेट्टी यांच्याशी चर्चा करीत आहेत. आंदोलन लांबल्यास त्याचा सर्वात जास्त फटका साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता असल्याने लवकरच आंदोलनात तोडगा निघण्याची शक्यता आहे.