भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अहवाल प्रकाशित केल्यापासून शेअर्समध्ये सतत घसरण होत आहे. यामुळे अदानी समुहाचे बाजारमूल्य १०० अब्ज डॉलरच्या खाली आले. एवढेच नाही तर अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदानी सातत्याने खाली घसरत आहेत. आता ते २६ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. याबाबत बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, मंगळवारी अदानी समुहाच्या दहा कंपन्यांचे मार्केट कॅप ८,२०,९१५ कोटी रुपयांवर घसरले. डॉलरच्या तुलनेत याचे मूल्य १०० अब्ज डॉलर्सच्या (८,२७,९७० कोटी रुपये) खाली पोहोचले आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी रोजी प्रकाशित झाल्यापासून, समुहाचे एकूण बाजार भांडवल १३३ अब्ज डॉलरने घटले आहे.
आजतकमधील वृत्तानुसार, हिंडेनबर्ग अहवालानंतर शेअर्समध्ये झालेली घसरण लक्षात घेता, अदानी समुहाने आरोप निराधार असल्याचे एका निवेदनात म्हटले होते. परंतु याचा फारसा परिणाम गुंतवणूकदारांवर झालेला नाही. तेव्हापासून आजअखेर अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स रोज कोसळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही शेअर्समध्ये नक्कीच वाढ होत असली तरी हा तोटा भरून काढण्यासाठी ते पुरेसे नसल्याची स्थिती आहे.