महाराष्ट्राला सीरमचे अदार पूनावाला १.५ कोटी लस देणार: आरोग्यमंत्री टोपेंचा दावा

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी वीस मेनंतर महाराष्ट्राला १.५ कोटी डोस देण्यास अनुमती दिल्याची माहिती टोपे यांनी दिली. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत लसीचा तुटवडा असल्याचे मध्यंतरी समोर आले होते. यादरम्यान अनेक राज्यांनी लस नसल्याने मोहीम थांबविल्याचेही समोर आले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना मंत्री टोपे म्हणाले, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदार पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिले आहे. वीस मे नंतर कोविशिल्डचे १.५ कोटी डोस उपलब्ध होतील. त्यानंतर आम्ही १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू करू असे टोपे यांनी सांगितले.

लस तुटवड्यामुळे मोहीम रखडली
महाराष्ट्रात कोरोनाबाबत कॅबिनेट बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर टोपे म्हणाले, लस नसल्याने १८-४४ वयोगटाचे लसीकरण थांबले आहे. या वयोगटाची लस ४५ वर्षावरील लोकांना दिली जात आहे. महाराष्ट्रात अद्याप कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. बुधवारी ४६,७८१ नवे रुग्ण आढळले होते. तर ८१६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण ५२,२६,७१० जणांना कोरोना झाला असून ७८००७ जणांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here