नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात 60 दिवसांच्या शांतता कराराची घोषणा झाल्यानंतर केंद्र सरकारने खरीप हंगाम 2026 साठी देशातील खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. रसायन आणि खत मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, जागतिक स्तरावरील अनिश्चिततेनंतरही खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही मोठी अडचण निर्माण झालेली नाही. मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत खत विभागाच्या संयुक्त सचिव वंदना प्रयाशी यांनी सांगितले की, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (DA&FW) खरीप 2026 हंगामासाठी खतांची गरज पुन्हा निश्चित केली असून ती 383.9 लाख मेट्रिक टन (एलएमटी) इतकी आहे.
प्रयाशी म्हणाल्या कि, सध्या देशात 196.65 लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे, जो एकूण गरजेच्या सुमारे 51 टक्के आहे. सामान्यतः हा साठा सुमारे 33 टक्के असतो. त्यामुळे यंदाची परिस्थिती अधिक समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या प्रभावी नियोजन, आगाऊ साठवणूक आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापनामुळे खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यश आले आहे. चालू खरीप हंगामात देशातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत 102.78 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची खरेदी केली आहे. हे हंगामातील एकूण गरजेच्या सुमारे 27 टक्के आहे.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, सध्या देशात 22.67 लाख मेट्रिक टन सेंद्रिय खतांचा साठा उपलब्ध आहे. यापैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत 11.82 लाख मेट्रिक टन सेंद्रिय खतांची खरेदी केली आहे.मागील वर्षी याच कालावधीत ही खरेदी केवळ 3.31 लाख मेट्रिक टन होती. त्यामुळे सेंद्रिय खतांच्या वापरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.वंदना प्रयाशी यांनी सांगितले की, हा बदल शेतकऱ्यांचा सेंद्रिय पोषक घटकांकडे वाढता कल दर्शवतो. रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय पर्याय स्वीकारण्याकडे शेतकरी वळत असल्याचे हे सकारात्मक संकेत आहेत.
खरीप हंगामात खतांच्या उपलब्धतेसंदर्भात कोणतेही मोठे आव्हान निर्माण झालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या माहितीनुसार, अलीकडील जागतिक परिस्थितीनंतरही देशात 123.65 लाख मेट्रिक टन देशांतर्गत उत्पादन आणि 39.36 लाख मेट्रिक टन आयात करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 163.01 लाख मेट्रिक टन खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.सरकारच्या मते, पुरेसा साठा, वेळेवर आयात आणि देशांतर्गत उत्पादनातील वाढ यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
कृषी तज्ज्ञांच्या मते, खरीप हंगामात वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता ही उत्पादनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत देशातील मजबूत साठा आणि सक्षम पुरवठा व्यवस्था ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.जागतिक स्तरावर पुरवठा साखळी आणि भू-राजकीय परिस्थितीबाबत अनिश्चितता असतानाही भारताने खतांचा पुरेसा साठा राखल्याने खरीप हंगामातील कृषी उत्पादनाला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


















