आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांच्या मदतीने सक्षम करणार : प्रा. शिवाजीराव सावंत

सोलापूर : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाती आदिनाथ सहकारी साखर कारखाना रहावा, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. कारखाना वाचवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या क्षेत्रातील किमान वीस टक्के तरी ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले. कारखान्याच्या २८ व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे उपस्थित होते.

प्रा. सावंत म्हणाले की, आदिनाथ कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. तो वाचवणे गरजेचे आहे. या तालुक्यात आमचा भैरवनाथ कारखाना आहे. तरीसुद्धा आम्ही ‘आदिनाथ’ला मदत करत आहोत. कारखाना उभा करण्यासाठी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी तपश्चर्या केलेली आहे. हा कारखाना उध्वस्त झाला तर आपली पुढली पिढी माफ करणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस ‘आदिनाथ’ला घालावा. कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे म्हणाले की, यावर्षीच्या ऊसाला २५५१ रुपये पहिला हप्ता रोख काटा पेमेंट व शक्य तेवढा जास्तीचा हप्ता दिवाळीला दिला जाईल. ऊस वाहतूकदारांना रोखीने ऊस भाडे दिले जाईल. जास्तीत जास्त ऊस कारखान्याला घालावा. यावेळी महेश चिवटे, संजय गुटाळ यांची भाषणे झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here