कोल्हापूरात पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी प्रशासन कार्यरत आहे – एनडीआरएफची 2 पथके, आर्मीचे 80 जणांचे पथक आणि नेव्हीचे पथक विमानाने येत आहे

कोल्हापूर, दि. 6 : पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ही पूरपरिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग करण्याच्या दृष्टिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्याशी संवाद साधून विसर्ग वाढविण्याबाबत चर्चा केली, त्यामुळे अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यात आला असून पाण्याची पातळी खाली येईल. लोकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आज ही पूर्व परिस्थिती पाहण्यासाठी मी पुण्याहून कराडपर्यंत पोहचलो परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे पुढे येता आले नाही. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले जिल्ह्यातील धरण प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. त्याचपध्दतीने पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यामुळे सकाळी 6 वाजता अलमट्टी धरणातून 3 लाख 3 हजार क्युसेकचा असणारा विसर्ग वाढविण्यात आला असून आता तो 4 लाख क्‍युसेक करण्यात आला आहे. यापुढील काळातही दोन्ही राज्यामध्ये योग्य समन्वय ठेवून पूरपरिस्थिती नियंत्रीत करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात पावासचे प्रमाण वाढले असून काही केल्या पाऊस थांबत नाही .जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे विसर्ग न केल्यास धरणांना धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साठले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी प्रशासन कार्यरत आहे. एनडीआरएफची 2 पथके, आर्मीचे 80 जणांचे पथक आणि नेव्हीचे पथक विमानाने कोल्हापूरात येत आहे. या सर्वांची मदत घेऊन जिल्ह्यातील गंभीर बनत चालेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही या पथकांमार्फत करण्यास प्राधान्य दिले जाईल. लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here