लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांनी भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याची भूमिका मांडली आहे. भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा मागे घेतल्यानंतर दोन्ही देशांमध्ये ऑगस्ट २०१९ पासून व्यापार बंद झाला आहे. भारतासोबत आज व्यापार सुरू करण्याची वेळ आली आहे, असे दाऊद यांनी म्हटल्याचे वृत्त डॉन न्यूजने दिले आहे.
यासंदर्भात नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, दाऊद म्हणाले की, आम्ही व्यापार सुरू करू इच्छितो अशी वाणिज्य मंत्रालयाची भूमिका आहे. मला असे वाटते की, आम्हाला भारतासोबत व्यापार सरू करण्याची गरज आहे.
दाऊद हे कापड उद्योग, उत्पादन आणि गुंतवणूक या विषयांबाबत पंतप्रधानांचे सल्लागार आहेत. भारतासोबत व्यापार सर्वांसाठी फायदेशीर आहे. खासकरून पाकिस्तानसाठी असे दाऊद यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान-भारत द्विपक्षीय व्यापारी संबंध अंशतः खुले होण्याची शक्यता वाढली आहे. पाच ऑगस्ट २०१९ रोजी भारताने जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा समाप्त केलयानंतर दोन्ही देशांकडील व्यापार बंद झाला आहे. मार्च २०२१ मध्ये पाकिस्तन आर्थिक समन्वय समितीने भारताकडून साखर, कापूस आयातीवरील निर्बंध हटवले होते. मात्र, नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.