कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्र आणि तामीळनाडूतील शेतकऱ्यांची आता बैठक होणार आहे. याबाबत भारतीय किसान युनियनचे (बिकेयू) नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, जेथे लोक आम्हाला बोलावतील, आणि गरज असेल तेथे आम्ही बैठकीस जाऊ. राकेश टिकैत यांनी सांगितले की, १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे आणि १७ डिसेंबर रोजी ते तामीळनाडू येथे जाणार आहेत.
आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा झाल्यानंतर सिंधू सीमेवर शेतकऱ्यांनी आपला तंबू, झोपडी काढून नेण्यास सुरुवात केली आहे. एक वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी असल्याने शेतकरी आपल्यासोबत आठवणीही घेऊन चालले आहेत. कोणी आपल्यासोबत माती घेऊन जात आहे तर कोणी येथील विट आपल्यासोबत घेऊन जात आहे. पंजाब येथील भटिंडा जिल्ह्यातील रामपुरा गावातील सरबजीत सिंह हे आपण बनवलेली झोपडी गावी घेऊन गेले आहेत. एक वर्षभर सरकारसोबत केलेल्या संघर्षाच्या या स्मृती असल्याचे त्यांनी सांगितले.