नवी दिल्ली : वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यातील एमपीसीच्या तातडीच्या बैठकीत रेपे रेट वाढविल्यानंतर आता जून महिन्यातील नियमित बैठक होईल. जून महिन्यातील बैठकीतही रेपो रेट वाढेल अशी शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आरबीआय जूनच्या बैठकीनंतरही दरवाढ सुरू ठेवेल. अशात महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलसह अनेक गोष्टींवर कर घटवला आहे. त्यानंतर चांगल्या मान्सूनमुळे आरबीआयला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने यंदा मान्सून सामान्य राहील अशी शक्यता वर्तवली आहे. दक्षिण-पश्चिम मान्सून भारतातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. कृषी क्षेत्राला कोविड महामारीच्या काळात फटका बसला नव्हता, उलट त्यात ४ टक्क्यांची वाढच झाली. जर आता मान्सून चांगला राहीला तर महागाई मर्यादीत राहण्यास मदत होईल. महागाई वाढण्यात महत्त्वाचा भाग खाद्यपदार्थांच्या वस्तूंचा आहे. सरकारने १३ मे रोजी गहू निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला. तसेच पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी अनुक्रमे ८ व ६ रुपयांनी कमी केली आहे. चांगल्या मान्सूनमुळे आणि आरबीआयने रेपो रेट ०.५० टक्के वाढविल्यास महागाई कमी होऊ शकते. मात्र, ईएमआय वाढेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.