‘स्वाभिमानी’ प्रति टन ४०० रुपये हप्त्यासाठी आक्रमक, साखर वाहतूक करणारी वाहने रोखली

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रति टन ४०० रुपये हप्त्यासाठी आक्रमक झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सहकारी साखर कारखान्यापासून काही अंतरावर साखरेचे ट्रक अडविले आणि ट्रकच्या चाकातील हवा सोडून दिली. कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. कुठल्याही साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू नये, यासाठी ‘स्वभिमानी’चे कार्यकर्ते सतर्क झाले असून आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामामध्ये पुरवलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रूपये द्यावेत, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी 13 सप्टेंबर 2023 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. त्यावेळी संघटनेने साखर कारखान्यांना 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर  कारखान्यातून साखर बाहेर पडू न देण्याचा इशारा देण्यात आला होता.

प्रति टन ४०० रुपयांचा हप्ता मिळेपर्यंत माघार नाही : माजी खासदार राजू शेट्टी

गेल्या वर्षभरात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर इथेनॉल, वीज आणि अन्य उपपदार्थांच्या माध्यमातूनही साखर कारखान्यांची कमाई आणि फायदा वाटला आहे. आम्ही कारखान्यांन मिळालेल्या अतिरिक्त नफ्यातून शेतकऱ्यांचा हक्काचा वाटा मागत आहोत. त्यामुळे जोपर्यंत कारखाने प्रति टन ४०० रुपयांचा हप्ता देत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले.

साखर वाहतूक करणारी वाहने कारखान्यातून बाहेर पडली तर कार्यकर्त्यांनी गाडीचे नुकसान न करता त्या गाडीतील साखरेच्या पोत्यावर पाणी ओतण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी साखर वाहतूक करणारी वाहने अडवून आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा देत असल्याचे पत्रक अध्यक्ष सुभाष जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे. जाधव यांनी ‘स्वाभिमानी’ला मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी संघटना व मालवाहतूकदार संघटितपणे काम करतील : जाधव

कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे. आपण शेतक-यांसाठी अहोरात्र काम करत आहात. आपली साखर कारखानदारांकडील मागणी योग्य आहे. त्यासाठी आपण लढा देत आहात, परंतु आमच्या मालवाहतूक करणा-या ट्रक चालक, मालक यांना कोणताही त्रास होऊ नये, वाहनांचे नुकसान होऊ नये, याबाबत आपण आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात. आमचा वाहनधारक देखील खूप अडचणीत आहे. आपले आंदोलन मिटेपर्यंत ट्रकधारकांना साखर भरण्यासाठी साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन आम्ही केलेले आहे. शेतकरी संघटना व मालवाहतूकदार संघटना एकत्रित संघटितपणे काम करतील व पुढे सुध्दा करु, असे निवेदनात म्हटले आहे.  शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनने आंदोलनाला पाठींबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, आंदोलनादरम्यान मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे, यासाठी आंदोलन करत आहोत.

शरद कारखान्यावर तीन ट्रकच्या चाकातील हवा सोडली…

दरम्यान, गुरुवारी 5 ऑक्टोबर 2023 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नरंदे येथील शरद कारखान्याची साखर वाहतूक पुन्हा रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने शरद सहकारी साखर कारखान्यापासून काही अंतरावर साखरेचे ट्रक अडविले. परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रकच्या चाकातील हवा सोडून दिली व कार्यकर्ते पसार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here