गेल्या हंगामातील अंतिम दर जाहीर न केल्यास आंदोलन : शेतकरी संघटनेचा इशारा

सातारा : फलटण तालुक्यातील साखर कारखानदारांनी मागील वर्षी गाळप केलेल्या उसापोटी अंतिम दर जाहीर करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा तालुक्यातील शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले आहे.

गेल्या हंगामात तालुक्यातील कारखान्यांनी २७०० ते २८०० रूपये उचल दिलेली आहे. या कारखान्यांकडून अंतिम दर अद्याप जाहीर केलेला नाही. श्रीराम सहकारी साखर कारखाना, स्वराज साखर कारखाना उपळवे, शरयू साखर कारखाना प्रा. लि. मोटेवाडी व श्रीदत्त इंडिया साखर कारखाना प्रा. लि. साखरवाडी या कारखान्यांनी तालुक्यातील १८ ते २० लाख टनाचे गाळप केलेले होते. मात्र, दर कमी दिला. याउलट शेजारी बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याने ३४११ रुपये, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ३३५० रुपये असा अंतिम दर जाहीर केला आहे.

फलटण तालुक्यातील उसाचा उतारा बारामती तालुक्यातील उसापेक्षा जास्तच आहे. सर्व कारखानदारांनी ३३०० ते ३४०० रुपये अंतिम दर जाहीर करावा. अन्यथा १० ते १२ दिवसांनी उपविभागीय कार्यालयासमोर कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केले जाईल, असे सचिन ढोले यांनी सांगितले. अशोकराव सस्ते, बजरंग गावडे, मच्छिंद्र निकम, महादेव कदम, शामराव आडके, वाल्मीक एजगर, आझाद सिंह उर्फ शंभूराज खलाटे, दिलावर काझी, विकास माळी आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here