साखरेच्या दुहेरी दर धोरणामुळे मिळेल साखर कारखान्यांना दिलासा

 

नवी दिल्ली: साखरेच्या दुहेरी दर धोरणामुळे बँकांकडे साखर गहाण ठेवून त्यावर व्याज देण्यापासून कारखान्यांची सुटका होण्यास मदत होईल. ६० ते ७० टक्के साखर जर जास्त दराने विकली तरी कारखान्यांची कॅश फ्लो वाढून त्यांना बँकांकडे जाण्याची गरज पडणार नाही. कारखाने स्वतः त्यांचा निधी उभारू शकतील, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

साखरेचे घसरणारे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण ठरविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्यानुसार घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर ठरविण्यासाठी सूत्र तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने अन्न मंत्रालयाला केल्या आहेत. त्याबाबत नाईकनवरे बोलत होते. साखरेच्या दुहेरी दर धोरणामुळे संकटातील साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे.

साखरेच्या एकूण वापरापैकी आइस्क्रिम उत्पादन, शीतपेय उत्पादक आणि अन्न प्रक्रिया उद्योगात ६५ टक्के साखर वापरली जाते. या उद्योगांना जास्त दराने साखर विक्री केल्यास सामान्य ग्राहकांना झळ न बसताही कारखान्यांची वित्तीय स्थिती सुधारू शकते. “साखरेचे दुहेरी दर धोरण ही संकल्पना ऐकायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि परीक्षण करताना मोठी जटीलता निर्माण होईल. व्यापाऱ्यांनी घरगुती वापराच्या दराने साखर खरेदी करून औद्योगिक दराने विकल्यास तेव्हा तुम्ही काय करणार,” असे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी विचारले .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here