बगॅस घेउन जाणाऱ्या गाडया आडवून साखर कामगारांचे आंदोलन

पंढरपूर, जि. सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे गेल्या ११ पेक्षा अधिक महिन्यांपासून कामगारांना पगार मिळाला नाही. थकीत वेतनामुळे ‘विठ्ठल’च्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या अनेक कामगार रोजंदारीने मजुरी करू लागले आहेत. वेतन नसल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या सर्व विभागांच्या कार्यालयांना टाळे ठोकून दिवसभर कामकाज बंद ठेवले होते. कामगारांनी पुकारलेल्या अचानक आंदोलनामुळे कारखान्याचे सर्वच कामकाज ठप्प झाले.कारखान्याने विक्री केलेल्या बगॅसचीदेखील कामगारांनी वाहतूक रोखली आहे.

जवळपास १५ हून अधिक बगॅस भरलेल्या ट्रक प्रवेशद्वारावरच रोखून धरल्या आहेत. जोपर्यंत थकीत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत कारखान्यातून बगॅस किंवा साखरेचे एक पोतेही बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.

अशा परिस्थितीत संचालक मंडळाने थकीत वेतन देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु संचालक मंडळाने दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे पुन्हा कामगार थकीत वेतनाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात रामभाऊ आंबुरे, पोपट शेळके, जोती कुंभार, दत्तात्रय निर्मळ, रामभाऊ चव्हाण आदींसह कामगार सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनाला बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, माजी संचालक शेखर भोसले, काशिनाथ लवटे यांनी पाठिंबा देत कामगारांच्या मागे कायम उभे असल्याचे सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here