अहमदनगर : ऊस दरासाठी भाजपचे माजी आमदारही मैदानात

अहमदनगर : यंदा उसाला किमान तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आता ऊस दर आंदोलनात भाजपच्या माजी आमदारांनी उडी घेतली आहे. जिल्ह्यात २२ साखर कारखाने आहेत. यात १४ सहकारी साखर कारखाने असून त्यापैकी १३ कारखान्यांनी पहिली उचल घोषित केली आहे. या कारखान्यांनी २५०० ते २८०० रुपयांपर्यंत दर जाहीर केला आहे. परंतु काही कारखान्यांनी उचल जाहीर केलेली नाही. याबाबत शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासमोर झालेल्या बैठकीत तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कारखानादारांना दर जाहीर करावा, असे निर्देश दिले आहेत. याबाबत मंगळवारी (28 नोव्हेंबर) नेवासा तहसील कार्यालयात कारखानदार, शेतकरी, अधिकाऱ्यांची बैठक होत आहे

नेवासा तालुक्यातील, परिसरात ‘मुळा’, ‘ज्ञानेश्वर’ आणि ‘गंगामाई’ या तिन्ही कारखान्यांनी उसाची पहिली उचल किमान ३,१०० रुपये द्यावी, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.  मुरकुटे यांनी सांगितले की, नेवासा तहसील कार्यालयात उद्या बैठक होत असून, शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार रुपयांच्या पुढे मिळावी, अशी मागणी आहे. श्रीगोंद्यातील ‘गौरी’ आणि विखे कारखान्याने तीन हजार रुपयांपुढे पहिली उचल जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर नेवासा आणि परिसरातील ‘मुळा’, ‘ज्ञानेश्वर’ आणि ‘गंगामाई’ या कारखान्यांनी पहिली उचल द्यावी, अशी मागणी आहे. दरम्यान, श्रीगोंद्यातील ‘गौरी’ कारखान्याने सर्वाधिक उचल दिली आहे. यानंतर विखेंनी तीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केली. मात्र इतर कारखान्यांची कोंडी झाली आहे. अद्याप जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी दर घोषित केलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here