गोहाना : आहुलाना येथील चौ. देवीलाल सहकारी साखर कारखान्याने ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना जवळपास ८२ टक्के ऊस पिकांचे पैसे दिले आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आले आहेत. आहुलाना कारखाना ऊस बिले देण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर तर कॅथल कारखाना द्वितीय क्रमांकावर आहे.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लेखा शाखेचे मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र शर्मा यांनी सांगितले की, दहा नोव्हेंबर रोजी कारखाना सुरू करण्यात आला होता. १५ नोव्हेंबरला गाळप सुरू झाले. कारखान्याने १३९ कोटी ५८ लाख रुपयांचा ३८ लाख ५६ हजार क्विंटल ऊस खरेदी केला. त्यापोटी ८२ टक्के म्हणजे ११३ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. एकूण रक्कमेपैकी २५ कोटी ७३ लाख रुपये थकीत आहेत. हे पैसेही लवकर दिले जातील. आतापर्यंत १२ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. १० ते १५ दिवसांत शेतकऱ्यांना ऊस बिले दिली आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १११ गावे आहेत. कारखान्याने ३५०० शेतकऱ्यांचा ५० लाख क्विंटलचा ऊसाचा बाँड बनवला आहे. कारखान्याची प्रतीदिन गाळप क्षमता २५ हजार क्विंटल आहे. ३० एप्रिलअखेर ३९ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर कारखान्याने १.०७ कोटी रुपयांच्या विजेची विक्री केली आहे. शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात उशीर केला जात नसल्याचे चौ. देविलाल सहकारी साखर कारखान्याचे एमडी आशिष वशिष्ठ यांनी सांगितले.