कोल्हापूर : आजरा तालुक्यातील आजरा साखर कारखान्यात २०२३ – २०२४ गळीत हंगामासाठी रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. शिंत्रे म्हणाले, २०२३ -२०२४ गाळप हंगामासाठी कारखान्याकडे ८५०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. गळीत हंगाम व्यवस्थित पार पडावा यासाठी मशिनरी देखभाल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत. ३० सप्टेबरपूर्वी कारखान्याची सर्व कामे उरकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आजरा साखर कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
शिंत्रे म्हणाले, गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जावा, यासाठी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक अंजना रेडेकर, विष्णू केसरकर, मधुकर देसाई, कार्यकारी संचालक डॉ. टी.ए.भोसले, महाव्यवस्थापक व्ही.एच. गुजर आदीसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.