अन्नधान्याची महागाई जगातील अनेक देशांसाठी आता चिंतेचा विषय बनली आहे. खास करुन विकसित देशही वाढत्या महागाईने त्रस्त दिसत आहेत. अशा स्थितीत भारत, जगभरासाठी अनोखे उदाहरण बनला आहे. कारण, येथे महागाई नियंत्रणात आहे. कन्झ्युमर फुड प्राइस इंडेक्सनुसार भारतात या वर्षी मार्च महिन्यात महागाईचा दर ४.७९ टक्के राहिला. तर फेब्रुवारी महिन्यात हा दर ५.९५ टक्के आणि गेल्या वर्षी मार्च महिन्यात ७.६८ टक्के होता.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारताने महागाईवर नियंत्रण मिळवून जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. दुसरीकडे विकसित देशांसह अनेक देशांची चिंता वाढली आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपात महागाईचा दर अनु्क्रमे ८.५ टक्के, १९.१ टक्के आणि १७.५ टक्के आहे. तर लेबनान, व्हेनेझुएला, अर्जेंटिना झिंबाब्वेमध्ये हा दर अनुक्रमे ३५२ टक्के, १५८ टक्के १०२ टक्के आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जगभरात महागाई वाढली आहे.
पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य प्रो. शामिका रवी यांनी वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सची आकडेवारी सादर करत भारताचे कौतुक केले आहे. ज्या देशात सर्वात कमी महागाई आहे, त्या देशांच्या यादीत भारत आहे. रशिया, युक्रेनमध्ये जगात सर्वाधिक धान्य उत्पादन होते. दोन्ही देशांतील युद्धामुळे धान्याचे जगाचे वितरण विस्कळीत झाले आणि ते महागाईचे कारण बनले आहे. दुसरीकडे भारताने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करून महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने पावले उचलली. रशियाकडून कच्चे तेल आयात करूनही भारताने यात भर घातली. रिझर्व्ह बँकेनेही रेपो रेट वाढवून उपाय योजना केली होती.