आंध्रप्रदेश : पोलिसांनी रोखली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा

41

विजयनगर : पोलीस प्रशासनाने भीमासिंगी साखर कारखान्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार मोडून काढला आहे. राज्य सरकारने कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी दिली नसल्याचे सांगत पोलिसांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गावांत एकत्र येण्यास बंदी घातली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करू देत नसल्याचा आरोप सीपीआय (एम) चे जिल्हा सचिव आणि जिल्हा रयत संघाचे उपाध्यक्ष तम्मिनेनी सूर्यनारायण, चल्ला जगन, व्यंकट राव आणि इतर दोन नेत्यांनी केला आहे.

याबाबत, द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सूर्यनारायण यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. भीमासींगी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. दुरुस्तीनंतर कारखाना सुरू होईल असे सांगून सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

दरम्यान, लोक सत्ता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शेट्टी बाबाजी यांनी राज्य सरकार उत्तर आंध्र प्रदेशातील अनेक बंद साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत बेफिकीर असल्याचा आरोप एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. सरकारने आधी मंत्र्यांसोबत एक उप समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. ऊस गाळपाबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकरी आपल्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here