आधी दर जाहीर करा, मगच गाळप परवाना द्या : रयत क्रांती संघटनेचे निवेदन

नाशिक : अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी एफआरपी पूर्ण दिलेली नाही. मागील वर्षातील एफआरपी पूर्ण केल्याशिवाय त्यांना गाळप परवाना देऊ नये. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २०२३-२४ च्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल जाहीर करावी व मगच त्यांना गाळप परवाना द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे यांनी उप प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

साखर कारखान्यांनी शेतकरी हितासाठी दर लेखी प्रसिद्ध करावा, अशी मागणी सांगळे यांनी केली आहे. काही कारखान्यांनी पहिली उचलही वेळेवर दिलेली नाही. जिल्ह्यात पाऊस वेळेवर न झाल्याने उसाची हवी तेवढी वाढ झालेली नाही. उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी ऊस जनावरांचा चारा म्हणून वापरला आहे. त्यामुळे उसाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये, अंतिम रक्कम चार हजार रुपये मिळावी असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सांगळे म्हणाले की, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ऊस उत्पादक शेतकरी व रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड बंद आंदोलन सुरू करतील. याबाबत नगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे, असे सांगळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here