अमेरिकन संसद सदस्यांकडून भारताच्या इथेनॉल धोरणाचे कौतुक

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकन संसद सदस्यांनी इथेनॉल धोरणाबाबत भारताचे कौतुक केले आहे. नऊ सदस्यांच्या समुहाने मंगळवारी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना देशातील ऊर्जा आणि हवामान बदलाच्या धोरणावरील उपायांतर्गत जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. याबाबत इथेनॉल उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी भारताचे प्रयत्न उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संसद सदस्यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षांनी जैव इंधनाचा सहज उपलब्ध होणारा पर्याय वापरण्याची गरज आहे. हे इंधन सध्याच्या दरातील वाढ रोखण्यास मदत करेल. याशिवाय दळणवळण उत्सर्जन कमी करण्यात ही उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरेल. कृषी, वनीकरण समितीचे सदस्य, जॉन थ्यून यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यांनी अमेरिकेच्या कृषी क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचा आग्रह बायडेन प्रशासनाकडे धरला. सदस्यांनी आपल्या पत्रात भारताने २०२२ पर्यंत १० टक्के आणि २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे. भारताने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. आपणही आपल्या देशाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी असे पाऊल उचलण्याची गरज आहे असे म्हटले आहे.

भारत २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या मार्गावर आहे. २०१३-१४ मध्ये सुरू केलेला इबीपी प्रोग्रॅम देशातील सर्व राज्यांत पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here