पुणे व कोल्हापूर येथील ट्रॉमा केअर सेंटरसाठी पदनिर्मितीस मंजुरी

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे आण‍ि कोल्हापूर येथे मंजूर करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी आवश्यक असलेल्या 92 पदांची निर्मिती करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या पदांमध्ये दोन्ही केंद्रांसाठी नियमित स्वरुपाची प्रत्येकी 37 अशी एकूण 74 आण‍ि बाह्यस्त्रोतांद्वारे भरावयाची प्रत्येकी 9 अशी 18 पदे समाविष्ट आहेत.

केंद्र शासनाच्या आरोग्य कुटुंब कल्याण विभागामार्फत सुवर्णचतुष्कोन योजना अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे येथील बी. जे. मेड‍िकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच कोल्हापूर येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन ठिकाणी लेवल २ मधील ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सेंटरचे बांधकाम व यंत्रसामग्रीसाठी निधी प्राप्त झाला आहे. बांधकामे व यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

या सेंटरसाठी आवश्यक नियमित पदांमध्ये वर्ग १ ते वर्ग ३ दरम्यानची ३७ पदे आहेत. त्यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अध‍िकारी, अध‍िपर‍िचारीका, क्ष-किरण तंत्रज्ञ यांचा समावेश असेल. तर बाह्य स्त्रोतांद्वारे भरण्यासाठी क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ ही 9 काल्पनिक पदे निर्माण करण्यात येणार आहेत. प्रत्येक सेंटरमध्ये 46 याप्रमाणे दोन्ही सेंटरची मिळून 92 पदे निर्माण होतील. त्यावर वेतनापोटी सुमारे 5 कोटी 54 लाख 43 हजारांचा वार्षिक खर्चही मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here