यशवंत कारखान्याच्या २१ जागांसाठी तब्बल ३२० उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यासाठी होणारी पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यादृष्टीने हवेली तालुक्यातील सर्व पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. सुमारे १३ वर्षांनंतर होणाऱ्या यशवंत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्यात पैशाचा खडखडाट असल्यामुळे काही सभासदांनी पुढाकार घेत निवडणूक निधी गोळा केला आहे. त्यानंतरच ही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. यशवंत कारखान्याच्या २१ संचालकांसाठी तब्बल ३२० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यशवंत कारखाना संचालक मंडळावर यापूर्वी बरखास्तीची कारवाई झाली होती. त्यामुळे बिनविरोध संचालक मंडळाची निवड करताना संचालक निवडीत हा मुद्दाही महत्त्वाचा राहील, अशी चर्चा आहे. बरखास्त संचालक मंडळाव्यतिरिक्त काही जुने नेतृत्व आणि युवानेतृत्वाला संधी देऊन नवीन संचालकांचा भरणा असलेले मंडळ निवडताना सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहील. त्यादृष्टीने येत्या आठवड्यात दोन बैठका आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसांत बिनविरोधाबाबतचे चित्र आता स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here