नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ च्या तिसऱ्या दिवशी भारताने तिसऱ्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारताच्या घोडेस्वार संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकले. १९८२ साली दिल्लीत खेळवण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी या क्रीडा प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकावले होते. भारतीय घोडेस्वार सुदीप्ती हाजेला, दिव्यकीर्ती सिंह, अनुष अग्रवाल आणि हृदय छेडा या चौघांच्या संघाने चमकदार कामगिरी करत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
अंतिम फेरीत या चौघांनी सर्वाधिक २०९.२०५ गुण मिळवले. अंतिम फेरीत दिव्यकीर्तीला ६८.१७६, हृदयला ६९.९४१ आणि अनुशला ७१.०८८ गुण मिळाले. चीनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. घोडेस्वार संघाने पटकावलेल्या सुवर्णपदकाच्या जोरावर भारत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आला आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदके पटकावली आहेत. यापूर्वी भारताचा महिला क्रिकेट संघ आणि पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील सांघिक विभागात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली.