नई दिल्ली : चालू गळीत हंगामात आतापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन १६ टक्क्यांनी वाढले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२० ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत देशातील साखर कारखान्यांनी २९९.१५ लाख टन साखरेचे उत्पादन केले असून ते गेल्यावर्षी याच कालावधीच्या तुलनेत ४१ लाख टनांनी जादा आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कारखान्यांनी २५८.०९ लाख टन साखर उत्पादीत केली होती.
मात्र, उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या घटली आहे. ३० एप्रिल २०२१ पर्यंत देशात १०६ कारखाने सुरू होते. गेल्यावर्षी याच कालावधीत ११२ कारखाने साखर उत्पादन करीत होते. महाराष्ट्रात ३० एप्रिलअखेर १०५.६३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ६०.९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. सद्यस्थितीत १६७ कारखान्यांनी गाळप बंद केले असून अद्याप २३ कारखाने सुरू आहेत. तर गेल्यावर्षी फक्त ३ कारखाने या कालावधीत सुरू होते.
उत्तर प्रदेशमध्ये ३० एप्रिल २०२१ अखेर कारखान्यांनी १०५.६२ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपेक्षा ते १०.९२ लाख टनांनी कमी आहे. या हंगामातील १२० पैकी ७५ कारखाने बंद झाले आहेत. राज्यातील बहुतांश कारखाने पुढील पंधरवड्यात गाळप पूर्ण करतील अशी शक्यता आहे. कर्नाटकमध्ये सर्व ६६ कारखान्यांचे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गाळप समाप्त झाले. ३० एप्रिलअखेर राज्यातील कारखान्यांनी ४१.६७ लाख टन साखर उत्पादन सुरू केले आहे. काही कारखाने जुलैपासून पुन्हा उत्पादन सुरू करू शकतात अशी शक्यता आहे.