अथणी शुगर- तांबाळे प्रती टन ३१०० रुपये ऊस दर देणार : एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील

कोल्हापूर : तांबाळे येथील अथणी शुगर भुदरगड युनिटने सर्व ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज केलेली आहे. मागील सर्व हंगामाप्रमाणे यावर्षीही ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत उचल होईल. तसेच हंगाम २०२३-२४ मध्ये उसासाठी ऊस तोडणी वाहतूक खर्च जास्त असूनदेखील इतर कारखान्यांच्या बरोबरीने प्रती टन ३१०० रुपये ऊस दर जाहीर केला आहे असे प्रतिपादन कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी केले. कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाचा ऊस मोळी पूजन समारंभ त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

यावेळी योगेश पाटील यांनी विद्यामंदिर झित्रेवाडी येथे विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्लान्टचे लोकार्पण केले. कार्यक्रमाला ऊस तोडणी मजूर, महिला यांच्यासह कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार उपस्थित होते. योगेश पाटील म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक श्रीमंत पाटील यांनी परिसरातील ऊस उत्पादकता वाढण्यासाठी शुगर ब्रिडिंग इन्स्टिट्यूट कोईमतूर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली व्यापक असा ऊस विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. यावेळी चीफ इंजिनिअर सुरेश शिंगटे, प्रकाश हेद्रे, जमीर मकानदार, कन्हैया गोरे, शिवाजी खरुडे, अमृत कळेकर, सतीश पाटील, संताजी देसाई, मुराद काझी, सुनील घुगरे, विवेक सूर्यवंशी, दिलीप गायकवाड, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब देसाई यांनी स्वागत केले. जनार्दन देसाई यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here